मुंबई : २३ लाखांचे दागिने घेऊन व्यवस्थापक पसार | पुढारी

मुंबई : २३ लाखांचे दागिने घेऊन व्यवस्थापक पसार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दुकानात ठेवलेले २३ लाख ४५ हजारांचे ४६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन एका व्यवस्थापकाने पोबारा केला. ही घटना गिरगावात उघडकीस आली आहे. राहुल सुनिल बौरी (मूळगाव चिंगरा, पश्चिम बंगाल) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. मन्ना (वय ४५, मूळगाव हावडा, पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मन्ना यांचा आणि त्यांच्या मामाचा गिरगावात सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी राहुल बौरी याला व्यवस्थापक म्हणून आपल्याकडे नोकरीला ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट २०२२ मध्ये एका व्यावसायिकाचे ४६९ ग्रॅम सोन्याचे दागिने मामा अरी यांच्या कारखान्यात बनवून दुकानातील तिजोरीत आणून ठेवले होते.

२ ऑगस्टच्या मध्यरात्री व्यवस्थापक बौरी याने त्याच्याकडे असलेल्या लॉकरच्या चावीच्या सहाय्याने तिजोरी उघडली आणि २३ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी करुन पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर मन्ना आणि अरी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या दोघांनीही बौरी याचा शोध सुरु केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर त्यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button