

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : फॅन्सी नंबर प्लेटमुळे वाहनाचा क्रमांक पटकन समजत नाही. त्यामुळे अशा दादा,बाबा,मामा नावाच्या नंबर प्लेटवर वाहतुक पोलिस कारवाई करतात. गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ हजार १९१ ई-चलान जारी केले आहेत. तरीदेखील फॅन्सी नंबरची क्रेंझ कमी झालेली दिसत नाही.
वाहनाच्या क्रमांकाचे आकडे, मूळाक्षरांचा आकार कसा असावा, याची परिवहन विभागाची नियमावली आहे. तरीदेखील नागरिक या आकडे आणि मूळाक्षरांमध्ये बदल करुन वेगवेगळी नावे तयार करुन त्या नंबर प्लेट म्हणून वापरतात. त्यामुळे वाहनाचे क्रमांक सहज लक्षात येत नाहीत. अशा नंबर प्लेटच्या गाड्या अनेकदा विविध गुन्ह्यात देखील वापरण्यात येतात. परंतु त्या गाड्यांचा नंबर कळत नसल्याने गाड्या पकडणे अवघड होते. परिणामी अशा नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर वाहतुक पोलिस कारवाई करतात.
मुंबई महानगरात वाहतूक पोलिसांनी २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण २९ हजार १९१ ई चलान जारी करुन एकूण १ कोटी ४३ लाख ३९ हजार ७०० रुपये दंड आकारला आहे. मात्र ई चलानचे दंड भरण्याचे प्रमाण कमी आहे. एकूण ई चलानपैकी ६ हजार ६७७ ई चलानची २७ लाख २८ हजार ५०० रुपये दंड वाहतूक पोलिसांना मिळाला आहे.
मुंबईत अशा फॅन्सी नंबर प्लेटचे वेड जास्त आहे. २०२१ मध्ये १३ हजार २५३ आणि २०२२ मध्ये ७ हजार ४५२ ई चलान जारी केले. ठाणे आणि नवी मुंबई वाहतुक पोलिसांनीही गेल्या दोन वर्षात केलेल्या कारवाईत अनुक्रमे ४ हजार ४०६ आणि ३ हजार ८२० ई चलान केले आहे.
हेही वाचा :