BREAKING : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, शाईफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात (व्हिडिओ) | पुढारी

BREAKING : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, शाईफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात (व्हिडिओ)

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथे श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आले असताना त्यांच्या अंगावर शनिवारी अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली. सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे शहरात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या घटनेचा भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. चोख पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे.

पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला लगेच ताब्यात घेतलं आहे. ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी तो करत होता. या व्यक्तीचं नाव अद्याप समजलेलं नाही. पाटील हे चिंचवड गावात श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त होते, त्यावेळी त्यांना काळे झेडे देखील दाखवण्यात आले.

पालक मंत्री चंद्रकात पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. या कार्यकर्त्यांनी ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्त्यांनी ज्योतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेतले होते. हे फोटो दाखवत त्यांनी पाटील यांना काळे झेंडे दाखवले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून राज्यात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसकडून वेगवेगळ्या शहरात निषेध व्यक्त केला जात आहे.

पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या संभाव्य गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी ते राहणार उपस्थित आहेत. शुक्रवारी महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता आहे. यामुळेच पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आला होता. असं असतानाही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाईफेक केली.

Back to top button