Karnataka-Maharashtra Border Dispute | महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी शिंदे-बोम्मई यांची भेट होणार | पुढारी

Karnataka-Maharashtra Border Dispute | महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी शिंदे-बोम्मई यांची भेट होणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र – कर्नाटक सीमप्रश्नावर (Karnataka-Maharashtra Border Dispute) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असून दोन्ही राज्यांतील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रश्नावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट होणार आहे.

बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुडगुसानंतर राज्य सरकारने यावर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यातही उमटायला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. (Karnataka-Maharashtra Border Dispute)या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे आदी मंत्री उपस्थित होते.

या बैठकीत एकूणच प्रकारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. हल्ला प्रकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली तसेच कारवाईची मागणी केली. त्यावर या हल्ला प्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांच्यापैकी काहींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच उर्वरित काही जणांवरही कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी बोम्मई यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होऊ नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. लवकरच या प्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट होणार आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button