Maharashtra Karnataka Border Dispute : कन्नड गुंडांचा बेळगावात उच्छाद; महाराष्ट्राची वाहने निवडून हल्ले | पुढारी

Maharashtra Karnataka Border Dispute : कन्नड गुंडांचा बेळगावात उच्छाद; महाराष्ट्राची वाहने निवडून हल्ले

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगावसह सीमाभागातील वातावरण बिघडवण्यात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या बंगळुरातील कन्नड संघटनेच्या गुंडांनी मंगळवारी पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर उच्छाद मांडत महाराष्ट्र नोंदणीच्या वाहनांवर हल्ले केले. हे सगळे पोलिसांच्या समक्ष घडले. तरीही त्या कन्नड गुंडांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. या प्रकाराचा सीमाभागासह महाराष्ट्रातूनही निषेध होत आहे.

या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही काही ठिकाणी उमटले. कर्नाटक नोंदणीच्या वाहनांना काही ठिकाणी काळे फासण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर कर्नाटक-महाराष्ट्र लांब पल्ल्याची बससेवा ठप्प झाली होती. कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र पासिंग असणारे सहा ट्रक फोडले. बेळगावजवळ पुणे-बंगळूर महामार्गावरील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर हा प्रकार घडला. एमएच पासिंग आणि वाहनांवर मराठी अक्षरे पाहून लक्ष्य बनवण्यात येत होते. या गुंडांनी मराठी फलकांना काळे फासून वाहनांवर लाल-पिवळा झेंडा लावला. ट्रकवर चढून गुंडांनी धांगडधिंगाही घातला. हे सगळे होत असताना ट्रकचालकांना जीव मुठीत धरून वाहनांतच बसून राहावे लागले, तर पोलिस मोठ्या संख्येने असूनही त्यांनी हल्लेखोरांवर बळाचा वापर केला नाही. हल्ले करू नका, सोडा, इतकेच ते बोलत होते.

सीमा वादावरून सुरू असलेल्या संघर्षानंतर कन्नड रक्षण वेदिकेने बेळगाव शहरात आंदोलनाचे नियोजन केले होते. मात्र पोलिस प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते. तसेच वेदिकेचा नेता नारायण गौडाला जिल्ह्याच्या सीमेवर हिरेबागेवाडी टोल नाक्यावरच ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्या निषेधार्थ टोल नाक्यावर कन्नड गुंडांनी धुडगूस घातला. घटनास्थळी अधिक पोलिस कुमक पाठवण्यात आली. त्यांनी काही गुंडांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, हिरेबागेवाडी पोलिस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी भेट दिली. त्यानंतर महामार्ग रोखणार्‍यांना ताब्यात घेऊन वाहतुकीला मार्ग देण्यात आला.

पोलिसांच्या समोरच वाहने अडवली

गुंडांकडून खुलेआम रस्त्यावर वाहनांची अडवणूक केली जात असताना पोलिसांनी रोखठोक भूमिका घेण्याऐवजी सौम्य भूमिका घेतली होती. त्यामुळेच गुंडांचे फावले होते. त्यांनी दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या. तसेच नंबर प्लेट मोडून टाकल्या. तसेच मराठी अक्षरांना काळे फासण्याचा प्रयत्न केला.

Back to top button