शरद पवारांना बेळगावाला जाण्याची वेळ येणार नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

शरद पवारांना बेळगावाला जाण्याची वेळ येणार नाही : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात तणावाचे वातावरण पसरले आहे. कन्नड वेदिकेच्या कार्यकत्यांनी मंगळवारी (दि.६) बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या घटनेबद्दल त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. यावर त्यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ६) दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

सीमाभागात महाराष्‍ट्रातील वाहनांवर होणारे हल्‍ले २४ तासांमध्‍ये थांबले पाहिजेत. नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. यावर शरद पवारांना बेळगावामध्ये जाण्याची वेळ येऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र नेहमीच कायद्याचे राज्य राहिले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच चिथावणीखोर विधाने करू नयेत, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई केली जाईल. तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्य़ांनी मला आश्वस्त केले आहे. आता बोम्मई काय कारवाई करणार, याकडे आमचे लक्ष आहे. त्याचबरोबर सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांबद्दल कोणाही वक्तव्य केल्याने त्यांचे महत्त्व कमी होत नाही. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे, देशाचे आदर्श होते. काल, आज आणि उद्याही आदर्श राहतील, असे फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीची राज्यपालांवर वेगळीच नाराजी आहे. त्यांच्यावर राग वेगळ्या कारणांनी आहे. आता छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून राज्यपालांवर महाविकास आघाडी राग काढत आहे. महापुरूषांचा अवमान आणि राज्यपालांच्या मुद्द्यावरून १७ डिसेंबरला विरोधक मोर्चा काढणार आहेत, यावर हा राजकीय अजेंड्यासाठी मोर्चा काढला जाणार असल्याची टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button