Anant Chaturdashi : मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज | पुढारी

Anant Chaturdashi : मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : रविवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना निर्बंधामुळे यंदा महापालिका कर्मचारी बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. यासाठी महापालिकेने २४ विभागांमध्ये २५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कोरोना संसर्गजन्य आजारामुळे गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १७३ कृत्रिम तलावाची उभारणी केली आहे. त्याशिवाय विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र, फिरती विसर्जन स्थळे देखील कार्यरत असणार आहे. अन्य ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळावरही पालिकेने विसर्जनाची (Anant Chaturdashi) जय्यत तयारी केली असल्याचे उपायुक्त, गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी सांगितले.

चौपाट्यांसह विविध नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत.

३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट आणि ३० जर्मन तराफा आदी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सरंक्षण कठड्यांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्था करण्‍यात आल्याचे काळे यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ : ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

Back to top button