राज्यपालांना त्यांची जागा दाखवून द्या, उदयनराजेंनी किल्ले रायगडवरुन डागली तोफ | पुढारी

राज्यपालांना त्यांची जागा दाखवून द्या, उदयनराजेंनी किल्ले रायगडवरुन डागली तोफ

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वधर्म समभावाच्या व्याख्येत बदल केला जात आहे. स्वार्थी लोकांमुळे महासत्ता नाही तर देशाचे महातुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाजी महाराजांचा आदर्श, सर्वधर्म समभाव घेतला नाही तर देशाची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. गप्प बसणारे राज्यपालांएवढेच दोषी आहेत. राज्यपालांना त्यांची जागा दाखवून द्या, असा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांवर केला. किल्ले रायगड येथे आयोजित ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्यात ते बोलत होते. शिवरायांच्या सन्मानासाठी निव्वळ घोषणा करून चालणार नाही तर आता कृती केली पाहीजे. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात सर्वांनी एकत्र या, असे आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे.

यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाची व्याख्या बदलली जात आहे. स्वार्थी लोकांमुळे देशाचे आधी तीन तुकडे झाले, आता तीस तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. राज्यपालांना त्यांची जागा दाखवून द्या. शिवरायांचा अपमान होऊनही गप्प बसणारे राज्यपालांएवढेच दोषी आहेत. शिवरायांनी जुलमी राजवट मोडून काढली. पण प्रत्येक जाती धर्माचा मान करण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांचा अपमान होत आहे. त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देण्याचा प्रयन्त केला जात आहे. शिवरायांचा अवमान होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. आपल्याला शिवरायांच्या विचारांचा विसर पडलाय. देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, तसं राज्यात राज्यपाल सर्वोच्च पद आहे. पद मोठं आहे पण पदावर असाणाऱ्याचं नाव घेवून त्याला मोठं करायच नाही मला. शिवरायांचा अपमान म्हणजे आपल्या सर्वांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.

मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येण्यासाठी लवकरच तारीख जाहीर केली जाईल. अपमान करणाऱ्यांविरूद्ध ठोस पावले उचलायला हवीत. शिवरायांचा अपमान करायला लाज वाटत नाही का? अपमान करणाऱ्यांविरद्ध आवाज उठवू. निव्वळ घोषणा करून चालणार नाहीत, तर आता कृतीही केली पाहीजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली तशी महाराष्ट्रभर जाऊन पुन्हा आपल्याला बांधणी करायची आहे. यासाठी तयार राहा, असे आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केले.

हेही वाचा :

Back to top button