विमानतळ धावपट्ट्यांच्या विस्तारीकरणासोबत प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

विमानतळ धावपट्ट्यांच्या विस्तारीकरणासोबत प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे. जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२८) येथे दिले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदीसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. तर शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे कपूर यांनी सांगितले.

विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच धावपट्ट्यांचे देखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चित करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठी देखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी – प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button