पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विषयीची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होऊ शकली नाही. या याचिकांवर नऊ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे . महाराष्ट्रातल्या 24 महानगरपालिका, जिल्हा परिषद , नगरपालिका अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. जून पासून न्यायालयात याबाबतची सुनावणी खोळंबली आहे.
निवडणुका लवकर घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. दरम्यान राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिका नवीन प्रभाग रचना करण्यासाठी हालचाली करू लागले आहे .सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणखी बारा दिवस लांबणीवर पडल्यामुळे आता निवडणुका कधी होणार, हे या याचिकांवरील निकालानंतरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, राज्य सरकार निवडणूक घेण्यास घाबरत आहे. आजची सुनावणी 9 डिसेंबर पर्यंत पुढे गेली असून त्यावेळी निवडणुकीबाबतचा निकाल लागण्याची शक्यता आहे.