…अशा प्रकारचे नवीन पायंडे पाडणे चुकीचे; गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी देण्याच्या आदेशावरून अजित पवारांचे टीकास्त्र | पुढारी

...अशा प्रकारचे नवीन पायंडे पाडणे चुकीचे; गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी देण्याच्या आदेशावरून अजित पवारांचे टीकास्त्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी देण्याच्या आदेशावरून विरोधी पक्षनेते अजित पावार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. दर पाच वर्षांनी निवडणुका येत असतात. पण अशा प्रकारचे आदेश काढलेले पहिल्यांदाच पाहिले, अशा प्रकारचे नवीन पायंडे पाडणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने चार जिल्ह्यातील मतदारांसाठी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. यावरून अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेजारच्या राज्यामध्ये निवडणुका आहेत, म्हणून आपल्या राज्यातील ठराविक जिल्ह्यांमध्ये सुट्टी दिली जाते. दर पाच वर्षांनी निवडणुका येत असतात. पण अशा प्रकारचे आदेश काढलेले पहिल्यांदाच पाहिले. सरकारने काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण अशाप्रकारचे नवीन पायंडे पाडणे चुकीचे आहे.”

शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याची वेळ राज्य सरकारने येऊ देऊ नये

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच पाहिजे. पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याची वेळ राज्यसरकारने शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वेळ द्यायला पाहिजे. त्यांच्या प्रश्नांसाठी सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे. चर्चा करायची नाही, ही सरकारची भूमिका योग्य नाही.

राज्यात वीज कनेक्शन तोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस हे थांबविण्याचे आदेश दिले म्हणतात, पण अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे शेतकरी वैतागला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यसरकारने कृषिविभागाच्या माध्यमातून थंडीमध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button