पुण्यात रात्री दहानंतर विनाकारण फिरणार्‍यांकडे होणार चौकशी | पुढारी

पुण्यात रात्री दहानंतर विनाकारण फिरणार्‍यांकडे होणार चौकशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सव काळात रात्री दहानंतर शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात कडक नाकाबंदी करण्यात येणार असून रात्री दहानंतर स्थानिक रहिवासी व वैध्य कारणाशिवाय फिरणार्‍या व्यतिरिक्त इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली.

प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका असे विविध मार्गाने जनजागृती करून सांगितले जात असताना मध्यवर्ती भागात गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच कारणास्तव शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवला जात आहे. मध्यवर्ती भागातील नवसाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. ही गर्दी गणेशोत्सवापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आता कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता विनाकारण फिरणार्‍यांकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी पाईंट करण्यात आले असून प्रत्येक नाकाबंदी पाईंटवर दहानंतर विनाकारण फिरणार्‍यांची चौकशी करण्यात येणार असून योग्य कारण न आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचेही संकेत डॉ. शिसवे यांनी दिले आहेत. शहरातील टिळक रोड वाहतुकीसाठी मोकळा असणार असून शहरातील मध्यवर्ती भागात जाताना मात्र नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान वाहतुकीतील सुचविल्या बदलानुसार वाहतुक सुरू असून बुधवारी शहरातील कोणतेही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले नसल्याचे वाहतुक विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

वाहतुकीतील हे बदल लक्षात ठेवा

शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणारा शिवाजी महाराज रस्ता स. गो. बर्वे चौकातून मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिकक चौक, टिळक रस्ता मार्गे पुढे जावे. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणार्‍या बाजीरव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौकातून वळविण्यात येईल, वाहने स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जाता येईल. नगर रस्त्यावरून स्वारगेट कात्रजला जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्ह चौकातून स्वारगेटकडे किंवा मार्केटयार्डकडे जाता येईल.

Back to top button