श्रीगोंदा : सरकारला शेतकर्‍यांचे देणे-घेणे नाही; शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन | पुढारी

श्रीगोंदा : सरकारला शेतकर्‍यांचे देणे-घेणे नाही; शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत झोपलेल्या सरकारला आणि अधिकार्‍यांना जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, या सरकारला शेतकर्‍यांचे काहीच देणे-घेणे नाही, असा आरोप करण्यात आला. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आजारी असल्याचे कारण पुढे करत असून, त्यांनीही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याची टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी (दि.21) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहटा, हरिदास शिर्के, दत्तात्रय गावडे, संजय आनंदकर, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप, शरद जमदाडे, मनोज ठवाळ, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते. राहुल जगताप म्हणाले, ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे लांबच आहे.

या उलट शेतकर्‍यांना वीजबिलासाठी वेठीस धरले जात आहे. अधिकार्‍यांकडून रोहित्र उतरविले जात आहेत. शेतकरीविरोधी भूमिका घेणार्‍या अधिकारी व सरकारचा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा त्यांनी निषेध केला. तालुक्याच्या लोक प्रतिनिधींनी आजारपणाचे सोंग घेतले असून, शेतकर्‍यांच्या, नागरिकांच्या समस्यांवर ते बोलायला तयार नाहीत. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘टायगर अभी जिंदा है’, या सारख्या घोषणा देत आहेत. राज्य सरकार नागरी समस्यांबाबत बेशरम झाले असल्याची टीका जगताप यांनी केली.

शेलार म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी, जून ते ऑक्टोबरपर्यंतचे वीजबिल माफ करावे, अतिवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, शेतकर्‍यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी माफ करावी, लंपीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच, गायरान व शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्याचा आदेश रद्द करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल.

भाजपचे प्रवक्ते असलेले राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करत असून, त्यांची ही वक्तव्ये म्हणजे भाजपचा अजेंडा असल्याची टीका त्यांनी केली. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करावयाची गरज नसल्याचे सांगणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेती कशी करायची याची माहिती दिल्यास, माझ्यासारखे कार्यकत राजकारण सोडून देतील. लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा रस्त्याच्या दुरवस्थेकडे विखे पाटील यांच्यासारख्या राजकारण्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

Back to top button