अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामिनावर २४ नोव्हेंबरला सुनावणी | पुढारी

अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामिनावर २४ नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : सीबीआयच्या प्रकरणात कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाच्या जामीन नाकारल्याच्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी दाखल घेत या अपिलावर २४ नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

देशमुख यांच्या अपिलावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वैयक्तिक कारणास्तव सुनावणीला असमर्थता दर्शविली. त्यानंतर ॲड. अनिकेत निकम यांनी आज दुपारी न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी २४ नोव्हेंबरला निश्चित केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी दिवाळीपूर्वी फेटाळून लावला होता. त्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. हे अपील सुट्टीकालीन न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी त्याची दखल घेऊन नियमित न्यायालयासमोर सुनावणी निश्चित केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button