ठाणे क्राईंम ब्रँचच्या हाती लागल्‍या ८ कोटींच्या बनावट नोटा; पालघरमध्ये सुरू होता छापखाना | पुढारी

ठाणे क्राईंम ब्रँचच्या हाती लागल्‍या ८ कोटींच्या बनावट नोटा; पालघरमध्ये सुरू होता छापखाना

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा ठाणे क्राईंम ब्रँचच्या युनिट पाचने पालघर एमआयडीसीत धाड टाकून दोन हजार रूपयांच्या नोटांचा छापखाना उध्वस्त केला. या छापखान्यात तब्बल आठ कोटींच्या दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिळून आले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ठाणे क्राईंम ब्रँचचे अप्पर पोलीस आयुक्त मोराळे यांना विचारले असता, पालघर एमआयडीसीत हा बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरू होता. याची माहिती ठाणे क्राईंम ब्रँचच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार खातरजमा करून पालघर येथील छापखान्यावर धाड टाकली. या धाडीत दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांचं घबाड पोलिसांच्या हाती लागले. शर्मा आणि राऊत नावाच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राऊत हा पालघरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बनावट नोटा या छापखान्यात छापल्या जात होत्या, अशी माहिती समोर येत आहे. या आधी छापलेल्या बनावट नोटा बाजारात चलनात आणल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त बनावट नोटांचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर असण्याची ही शक्यता आहे. हा पैसा अतिरेकी संघटना रसद पुरविण्यासाठी वापरण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. याचा मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी आता ताब्यात असलेल्या आरोपींकडून केली जात आहे.

अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे मोराळे यांनी सुमारे चार ते पाच तास आरोपींकडे कसून चौकशी केली. मात्र आरोपींनी अजून ही पोलिसांसमोर महत्वाची माहिती उघड केलेली नाही. या बनावट नोटा नुकत्‍याच पार पडलेल्‍या दिवाळी सणासुदीला बाजारात चलनात या टोळीकडून आणल्याची शक्यता नाकरता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन हजार रूपयांच्या नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या नोटा इतर राज्यात पाठवण्यात आल्या आहेत का? याचा ही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button