कमी पाण्यावर भातशेती, जाणून घ्या एरोबिक पद्धतीने कशी करावी लागवड? | पुढारी

कमी पाण्यावर भातशेती, जाणून घ्या एरोबिक पद्धतीने कशी करावी लागवड?

भाताचे पीक म्हणजे मुसळधार पाऊस आणि पाण्याने भरलेली भातखाचरे असेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु आता कमीत कमी पाण्यावर किंबहुना खाचरे पाण्याने भरून न ठेवता, इतर पिकांप्रमाणेच पाण्याच्या पाळ्या देऊन भातपीक घेणे शक्य झाले आहे. कमी पाण्यावर येणार्‍या भाताच्या काही जाती विकसित झाल्या असून, या पद्धतीने भातशेती करण्यात असलेल्या काही अडचणी दूर केल्यास ही पद्धती भूगर्भातील पाण्याची पातळी घटत असलेल्या ठिकाणीही उपयुक्त ठरेल.

भाताची शेती भरपूर पाऊस असलेल्या विभागात केली जाते. भाताची शेते पाण्याने सतत भरून ठेवलेली दिसतात. परंतु आता तशी गरज राहिलेली नाही. कमी पाण्यावर भात पिकविण्याचे तंत्र उपलब्ध झाले असून, गव्हाप्रमाणेच कमी पाण्यावर भातशेती करणे शक्य झाले आहे. या तंत्राच्या वापराने 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि फिलिपीन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने (आयआरआरआय) संयुक्तरित्या या पद्धतीचा विकास केला आहे. या संशोधनात कटक येथील केंद्रीय भात संशोधन संस्थेचाही (सीआरआरआय) सहभाग आहे. इतर पिकांप्रमाणेच पाण्याच्या काही नियमित पाळ्या दिल्यास तयार होणारे भाताचे काही वाण कटक येथील संस्थेनेच शोधून काढले आहेत.

सामान्यतः अधिक उत्पादन देणार्‍या भाताच्या इतर जातींमधून जेवढे उत्पादन मिळते, तेवढेच उत्पादन या नव्या जातींपासून मिळावे, यासाठीचे शेतीतंत्रही याच संस्थेने विकसित केले आहे. तांत्रिकद़ृष्ट्या ही पद्धत एरोबिक राइस कल्टिव्हेशन नावाने ओळखली जाते. या तंत्रात भाताच्या शेतात कायम पाणी भरून ठेवण्याची गरज राहत नाही आणि भाताची छोटी रोपे तयार करण्याचीही गरज भासत नाही. सामान्यतः भातशेतीत आधी रोपे तयार करून नंतर ती दुसरीकडे लावली जातात. नव्या तंत्रानुसार भातशेती करताना कौशल्याने तयार केलेल्या खाचरात थेट बियाणे पेरले जाऊ शकते आणि त्यामुळे वेळेची आणि श्रमांची बचत होते.

सीआरआरआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘एपो’ नावाचे ब्राझीलमधील भाताचा वाण हा जगातील सर्वोत्कृष्ट एरोबिक वाण मानला जातो. एपो वाणाचा भारतीय प्रजातींशी संकर घडवून भारतीय परिस्थितीला अनुकूल बियाणे तयार केले जात आहे. या जातींना पारंपरिक जातींच्या तुलनेत 40 टक्के कमी पाणी लागेल तसेच चांगले व्यवस्थापन केल्यास 4 ते 5 टन उत्पादन मिळविता येईल. एरोबिक स्थितीमध्ये म्हणजेच भातखाचरे पाण्याने भरून न ठेवता घेतल्या जाणार्‍या भाताचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणार्‍या उत्पादनापेक्षा प्रती हेक्टर दोन टन कमी असते.

एपो जर्मप्लाज्मसह एरोबिक भात बियाणे तयार करण्यासाठी ब्रीडिंग सामग्री आरआरआरआयकडून मिळविण्यात आली आहे. नव्या प्रजातींपैकी अनेकांच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतात घेण्यात आल्या असून, शहभागी धान ही यातील एक प्रजाती सीआरआरआय ब्रीडिंग नेटवर्कने यापूर्वीच अधिसूचित केली आहे. दुष्काळी भागातसुद्धा भातशेती करता यावी, हा यामागील उद्देश आहे. एक किलो भाताच्या उत्पादनासाठी सामान्यतः तीन ते पाच हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. सीआरआरआयच्या क्रॉप प्रॉडक्शन विभागाच्या म्हणण्यानुसार, भातशेतीसाठी अशा प्रकारे पाण्याचा वापर करणे हा शाश्वत मार्ग नाही.

आयआरआरआयच्या म्हणण्यानुसार, भात पिकासाठी होणारा जगभरातील पाणीवापर 10 टक्क्यांनी जरी कमी केला, तरी बिगरशेती वापरासाठी 150 अब्ज क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल.

अर्थात एरोबिक्स पद्धतीच्या भातशेतीमध्ये काही तांत्रिक समस्या आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी खास पावले उचलण्याची गरज आहे. यातील महत्त्वाची समस्या म्हणजे कमी पाण्यात पिकणार्‍या भाताच्या बियाणांची पेरणी केल्यानंतर शेतात उगवणारे तण. हे तण पोषक तत्त्वे मिळविण्यासाठी पिकांशी स्पर्धा करतात आणि त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पोषक तत्त्वे मिळत नाहीत. पिकाच्या विकासात 30 दिवसांच्या प्रारंभिक अवस्थेत ही समस्या विशेषत्वाने दिसून येते.

सीआरआरआयच्या शास्त्रज्ञांनी तणांचा नायनाट करण्यासाठी रसायनांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. दुसरी प्रमुख समस्या म्हणजे, लोहाची कमतरता. जेव्हा भातखाचरांत पाणी भरून ठेवलेले नसते, तेव्हा वातावरणातील ऑक्सिजन मातीत उपलब्ध असलेल्या लोहाचे ऑक्सिजनीकरण करून टाकतो आणि त्यामुळे रोपांना लोह कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी मातीत आयर्न सल्फेट मिसळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

एरोबिक राइस कल्टिव्हेशनबाबत केलेल्या प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, लेजर अँड लेव्हलिंग मशीनच्या मदतीने नांगरणी आणि सपाटीकरण केले तरच या पद्धतीद्वारे चांगले उत्पादन मिळू शकते. त्याबरोबरच सीड ड्रिल मशीनच्या मदतीने बियाणे पेरण्याची गरज असते. योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर एका रेषेत पेरणी केली जाणे गरजेचे असते. त्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे बैलांच्या, ट्रॅक्टरच्या किंवा पॉवर ट्रिलरच्या मदतीने चालविली जाऊ शकतात. पेरणीसाठी यंत्राचा वापर करणे अनेक दृष्टींनी फायदेशीर ठरते. बियाण्याच्या बचतीबरोबरच प्रतिहेक्टर जास्तीत जास्त रोपे उगवणे, तणांना प्रतिबंध, कमी गुंतवणूक आणि चांगले उत्पादन असे फायदे मिळतात.

कमी पाऊस किंवा सिंचन सुविधांची कमतरता यामुळे होणार्‍या विपरीत परिणामांपासून बचावासाठी एरोबिक पद्धतीने केलेली लागवड फलदायी ठरते. जिथे भूगर्भातील पाण्यावर एकाच वेळी अनेक पिके घेतली जातात, अशा भागांतसुद्धा ही पद्धती उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, पंजाबच्या वायव्य भागात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात तसेच दक्षिणेतील काही ठिकाणी अशी पिके घेतली जातात. अधिक उपसा असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी घटत असल्याचे दिसून आल्यास तेथे भाताचे पीक घेणे थांबवावे लागते. अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो.

– विलास कदम

Back to top button