परमबीर सिंग खंडणी प्रकरण : दोन निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा सेवेत रुजू | पुढारी

परमबीर सिंग खंडणी प्रकरण : दोन निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा सेवेत रुजू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना धमकावून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यातील संशयित पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करुन घेण्यात आले आहे. पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या आढावा बैठकीनंतर गोपाळे आणि कोरके यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न दाखवण्यात आले आहे.

भाईंदर मधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन जुलै २०२१ मध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, आशा कोरके, खासगी व्यक्ती सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी जैन आणि पुनमिया यांना अटकसुद्धा केली. त्यानंतर गोपाळे, कोरके यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली होती.

पुढे हे प्रकरण तपासासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आले. सीआयडीने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना याप्रकरणात अटक केली. त्यांनतर या दोघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. सीआयडीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गोपाळे आणि कोरके यांच्यासह संजय पुनमिया आणि सुनील जैन अशा चार जणांविरुद्ध दोन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात परमबीर सिंग यांचा संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता गोपाळे आणि कोरके यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले गेल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा :

Back to top button