संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस | पुढारी

संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्यव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला दिलेल्या प्रतिक्रियेनंतर संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून भिडे यांच्यावर टीका होत आहे.

संभाजी भिडे हे बुधवारी (दि २) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले होते. भिडे हे मुख्यमंत्र्याची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजी भिडे हे त्या महिला पत्रकारास म्हणाले, आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारत मातेचं रूप आहे. भारतमाता विधवा नाही. त्यामुळे तू कुंकू लाव तुझ्याशी बोलतो.

संभाजी भिडेंच्या या वक्यव्यानंतर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाहीस म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही, असे म्हणत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा मी निषेध करते. या आधाही संभाजी भिडे यांनी महिलांना कमी लेखणारी वक्यव्ये केली आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा तातडीने खुलासा करावा”, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

तुझ्या कपाळावर टिकली नाही, मी तुला प्रतिक्रिया देणार नाही

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. भिडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया विचारणार्‍या महिला पत्रकाराबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘तुझ्या कपाळावर टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही’, असे ते म्हणाले.

संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. या भेटीनंतर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने भिडे यांना भेटीसंदर्भात अधिक माहिती विचारली. यावर, प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो, असे विधान त्यांनी केले. यानंतर, अन्य पत्रकारांशी बोलताना भिडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत माहिती दिली.

मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रिमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. या भेटीबद्दल राजकीय अर्थ काढले जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचे होते. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आज वेळ काढून भेटत असल्याचे भिडे यांनी या भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार उत्तमरित्या काम करत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचलत का?

Back to top button