राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा : राजू शेट्टींची वैधमापन नियंत्रकांकडे मागणी | पुढारी

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा : राजू शेट्टींची वैधमापन नियंत्रकांकडे मागणी

जयसिंगपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वैधमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांच्याकडे केली. यावर साखर कारखान्यांचे वजनकाटे संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

राज्यात यंदाचा उसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांकडून उसाची सर्रास काटामारी होत आहे. तसेच दि. ७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचे मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे.

महाराष्ट्रात सुमारे ३५ लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी उसाचे वजन काटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजन काट्यामध्ये पारदर्शकता नसल्याने वजनात मोठी तफावत येते. खासगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. त्यासाठी आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या या तक्रारीचे गांभीर्य पाहता वैधमापन विभागाकडून यावर त्वरीत कार्यवाही होऊन साखर कारखान्यांचे वजन काट्यांचे कॅलिब्रेशन मध्ये एकसमानता, सुसुत्रता व पारदर्शकता राहणे करीता सर्व वजन काट्यांची कार्यांवीत संगणक प्रणाली एकच असणे व त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावे, यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वजन काटे ऑनलाईन करण्यासाठी एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे ऑनलाईन करून वजन काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शकता आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी, तसेच त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडूनच व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button