कोल्हापूर : काटा मारणाऱ्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही: राजू शेट्टी | पुढारी

कोल्हापूर : काटा मारणाऱ्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही: राजू शेट्टी

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसावर २०० दरोडेखोर कारखानदारांनी काटा मारून गत गळीत हंगामात सुमारे ५६०० कोटी रुपयांचा डल्ला मारला आहे. त्यामुळे या काठामार कारखानदारांचा काटा काढल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते दत्तवाडमधील गांधी चौक येथे आयोजित ‘जागर एफआरपी’चा या जाहीर सभेत बोलत होते.

या वेळी राजू शेट्टी म्हणाले की, “उसाच्या एका खेपेला किमान २ ते ३ टन काटा मारला जातो. या हिशेबाने गतहंगामात १३ कोटी २० लाख टन ऊस गाळप झाले. त्याचा विचार करता शेतकऱ्यांचे सुमारे ५६०० कोटी रुपये कारखानदारांनी लुटले आहेत. यामुळे ज्याप्रमाणे कोळसा व बॉक्साईट उद्योगात मोठ्या प्रमाणात काटा मारला जात होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने एक सॉफ्टवेअर विकसित करून यावर नियंत्रण आणले. तसेच पेट्रोल पंपावरही मापात पाप केले जात होते. यासाठी ऑइल कंपन्यांनी सॉफ्टवेअर विकसित केले. त्यामुळे पेट्रोल पंपावरील मापात होणारी हेळसांड थांबली. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील २०० कारखान्याचे २०० वजन काट्यांचे नियंत्रण करण्याबाबत साखर आयुक्त संजय गायकवाड यांना सांगितले आहे. त्यांनी वजन मापे महानिरीक्षक यांना याबाबत सूचित केले आहे.”

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस व दूध दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कारण येथील चळवळ आक्रमक आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात शेतकरी चळवळ थंडावली आहे. तेथे शेतीतील उत्पादनांचे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकरी चळवळ नेहमीच आक्रमक राहिली पाहिजे. तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. यासाठी १५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या २१ व्या ऊस परिषदेत एफआरपीपेक्षा किती रक्कम अधिक घ्यायची. तसेच गतगळीत हंगामातील ‘एफआरपी’अधिक २०० रुपये हे वसूल करायचेच, यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप म्हणाले की, सरकार कोणतेही असो ते शेतकऱ्यांचे वैरीच आहेत. शेतकरी वाचायचा असेल. तर चळवळ टिकली पाहिजे. राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी वन मॅन आर्मी आहेत. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, खासदार राजू शेट्टी हे एकमेव असे खासदार आहेत ज्यांना लोक नोटही व वोटही देतात.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले की, आज आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी ५० कोटीला विकला जातो, हे आपले दुर्दैव आहे. सद्यस्थितीत मजुरी, खतांचे व मशागतींचे वाढलेले दर पाहता एक एकरात ऊस पिकवण्यासाठी ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मिळणारा एफआरपीचा दरही कमी असून ऊसाला किमान ५००० रुपयापर्यंत दर मिळाला पाहिजे. शेतकरी समृद्ध बनेल. यासाठी आपल्या संघर्षाची तलवारी म्यान करून चालणार नाही. साखर कारखानदारांनीही उसाच्या रसापासून साखरेबरोबर, पौष्टिक जाम तयार करणे, बग्यासपासून मशरूम उद्योग तसेच इथेनॉलची क्षमता वाढवणे, यासारखे नवनवीन उद्योग सुरू करावेत. जेणेकरून ५ महिने चालणारे साखर कारखाने वर्षभर कार्यान्वित राहतील.

याप्रसंगी प्रा. संदीप जगताप, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, राम शिंदे, शैलेश अडके, नंदकुमार पाटील, बंडू पाटील आदीसह दत्तवाड येथील युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू चौगुले, सुकुमार सिद्धनाळे, प्रकाश सिद्धनाळे, श्रेणिक धूपदाळे, प्रकाश मगदूम आदीसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व दत्तवाड परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button