पत्नीला कारखाली चिरडले, चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याला अटक | पुढारी

पत्नीला कारखाली चिरडले, चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याला अटक

मुंबई : पुढारी ऑनलाईन; चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा याला पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. पत्नीला कारखाली चिरडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला काल अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कमल किशोर मिश्रा याने पत्नीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना अंधेरीमध्ये घडली होती.

अंधेरी येथे १९ ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमल मिश्रा त्याच्या पत्नीच्या अंगावर गाडी घालताना दिसला होता. त्याने अंगावर कार घातल्याने त्या गाडी खाली चिरडल्या गेल्या. यात त्या जखमी झाल्या आहेत. कमल मिश्रा हा फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध आहेत. कमल किशोर मिश्रा याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले

घटना अशी की, कमल किशोर याच्या पत्नीने कमल याला अंधेरी पश्चिमेच्या राहत्या इमारतीतील पार्किंगमध्ये दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर त्याने कारमधून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कमल याची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला. कमल यांनी विरोध करणाऱ्या पत्नीला न जुमानता त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांच्या पायाला, डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिश्रा याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली की ती तिच्या पतीला शोधत बाहेर आली आणि तो पार्किंग परिसरात त्याच्या कारमध्ये दुसर्‍या महिलेसोबत सापडला, असे अंबोली पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. जेव्हा ती त्याच्या समोर गेली तेव्हा त्याने घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार चालवली. यात त्या कारखाली चिरडल्या गेल्या. ज्यामुळे त्यांचा पाय, हात आणि डोक्याला दुखापत झाली आहे, असे अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देऊन सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिश्रा याने कारने धडक दिल्यानंतर त्याची पत्नी जमिनीवर पडताना दिसत आहे. कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलीस स्थानकात आयपीसीच्या २७९ आणि ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा तिने केला आहे.

हे ही वाचा :

Back to top button