कांदिवलीत ए.सी. बसला आग; शेकडो प्रवाशांचे थोडक्यात वाचले जीव | पुढारी

कांदिवलीत ए.सी. बसला आग; शेकडो प्रवाशांचे थोडक्यात वाचले जीव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कांदिवली पुर्वकडील क्रांतीनगर येथून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नसून वातानुकूलित बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र सुरक्षा धोक्यात आली आहे.

गुरुवारी लागलेली आग ही बस चालकाच्या केबिनमध्ये शार्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या जवानांनी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या मदतीला स्थानिक रहिवासीसुध्दा होते. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविल्याने कांदिवलीत मोठा अनर्थ टळला.

कांदिवली पुर्वकडील क्रांतीनगर विभागाकडे जाणारी बस क्र.२८८ ही लोखंडवाला येथील अलिकानगर या बस स्टॉपवर आली होती. त्यावेळी चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. ही आग भडकण्याआधीचं चालकाने तात्काळ बसचे दरवाजे उघडल्यामुळे बसमध्ये असलेले प्रवासी तात्काळ बाहेर पडले.

सायंकाळी ६ च्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबरात उडाली होती. कांदिवलीत दररोज क्रांतीनगर, दामूनगर, ठाकूर व्हिलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स या मार्गावरून सुमारे २० ते ३० वातानुकूलित बेस्टच्या कंत्राटी बसेस चालतात. यामुळे या सर्व बसेसची फायर ऑडिट करण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी पध्दतीने वातानुकूलित बसेस बेस्ट परिवहन सेवामध्ये चालविण्यास सुरुवात केली. यासाठी कंत्राटी चालकांची नियुक्ती करून सुमारे २ ते ३ हजार बसेस आज मुंबईत धावत आहेत. परंतु या बसेसमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याकारणाने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने सदर ए.सी. बसविषयी योग्य तो निर्यण घेवून मुंबईकरांचा सुरक्षित प्रवास करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जावू लागली आहे.

हेही वाचा;

Back to top button