PAKvsZIM T20WC: लढवय्या झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या! अवघ्या 1 रनने विजय | पुढारी

PAKvsZIM T20WC: लढवय्या झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या! अवघ्या 1 रनने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsZIM T20WC : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. पर्थ क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अवघ्या 1 रनने पराभव करत सर्व क्रिकेट जगताला एक धक्का दिला आहे. झिम्बाब्वेच्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकचा संघ 20 षटकात 8 बाद 129 धावाच करू शकला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पाकिस्ताच्या मसूद (44) वगळता इतर कोणताही फलंदाज आश्वासक फलंदाजी करू शकला नाही.

PAK vs ZIM Live : जिम्बाब्वे ने पाकिस्तान को हराकर किया बड़ा उलटफेर, वर्ल्ड कप से बाहर होने की कगार पर PAK

तत्पूर्वी, या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानच्या बाजूने मोहम्मद. वसीम ज्युनियर आणि शादाब खान यांनी घातक गोलंदाजी केली. वसीमने चार षटकात 24 धावा देत चार बळी घेतले. त्याच्याशिवाय शादाबने चार षटकांत 23 धावा देत तीन खेळाडू बाद केले. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या. कर्णधार इर्विन आणि ब्रॅड इव्हान्स यांनी 19-19 धावांची खेळी केली.

झिम्बाब्वेचा डावाला चांगल्या सुरुवातीनंतर गळती लागली. झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत लागेपाठ दोन विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना वेसण घातली. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट्स पडत गेल्या आणि त्यांना 20 षटकात 8 बाद 130 धावांच करता आल्या.

पाकिस्तानची पहिली विकेट

131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची पहिली विकेट अवघ्या 13 धावांवर पडली. कर्णधार बाबर आझम 9 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. ब्रॅड इव्हान्सच्या चेंडूवर रायन बर्लेने त्याचा झेल टिपला. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 20 होती.

रिझवानही पॅव्हेलियनमध्ये परतला

बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवानही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 16 चेंडूत 14 धावा केल्या. मुजारबानीचा चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टंपवर गेला. पुन्हा एकदा पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाजांनी निराशा केल्याने पाकिस्तानला विजय मिळवून देण्याची जबाबदारी मधल्या फळीवर आली आहे. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने दोन गडी गमावून 28 धावा केल्या.

इफ्तिखार अहमद फेल…

36 धावसंख्येवर पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. भारताविरुद्ध तडाखेबाज फलंदाजी करणारा इफ्तिखार अहमदचा यावेळी नवख्या झिम्बाब्वेच्या गोलंदाजासमोर टीकाव लागला नाही. तो 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. जोंगवेच्या गोलंदाजीवर चकाबवाने इफ्तिखारचा झेल पकडला.

रझाच्या फिरकीची जादू…

शादाब खान आणि शान मसूद यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 88 धावसंख्येवर शादाब खान बाद (14 चेंडूत 17 धावा) झाला. त्याला रझाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याच षटकात हैदर अलीला माघारी धाडण्यात रझाला यश आले. हैदर शुन्यावर बाद झाला. पाकिस्तानसाठी मोठा धक्का बसला तो मसूदच्या रुपाने. कारण मसूद एका बाजूने पाकचा डाव लढवत होता. मात्र तो 44 धावांवर असताना रझाने आपल्या 15.1 व्या षटकात फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी पाकची धावसंख्या 6 बाद 94 होती.

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्स गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने लाँग ऑफच्या फटका मारून तीन धावा घेतल्या. चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते पण झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि एक धाव वाचवली. पण त्यानंतर वसीमने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिस-या चेंडूवर 1 धाव चोरली. तर पुढचा चेंडू डॉट गेला. ब्रॅड इव्हान्सने आपल्या चतुराईने पुढच्या चेंडूवर नवाजला फटका मारण्यास उसकावले आणि त्याची विकेट घेतली. मिड ऑफला त्याचा झेल इर्विनने घेतला. अखेर शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी क्रिझवर होता. शाहीनने ब्रॅडचा शेवटचा चेंडू मीडऑनला फटकावला आणि दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेताना शाहीन धाव बाद झाला. अशा प्रकारे झिम्बाब्वेने रोमांचक सामन्यात झुंझार विजय मिळवला.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हैदर अली, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह.

झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन

रेगिस चकाभा (विकेटकीपर), क्रेग इर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, वेस्ली मधेवेरे, मिल्टन शुम्बा, ब्रॅड इव्हान्स, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा.

दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. याआधी पाकिस्तानला पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला होता, तर झिम्बाब्वेलाही पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी दोन्ही संघांकडे एकही गुण नाही.

Back to top button