ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी शिवसेनेची कोर्टात धाव

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी नियमानुसार दिलेला राजीनामा महापालिकेने मंजूर करावा, यासाठी शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे कर्मचारी सेवा नियमांचे पालन करूनही त्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाही. राजीनामा मंजूर करू नये यासाठी आयुक्तांवर शिंदे गटाकडून दबाव टाकला जात आहे, असा आरोप आमदार अनिल परब यांनी केला आहे.

आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या अंधेरी पूर्व विभागात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचे 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षाकडून निश्चित झाले आहे; पण त्यांचा अर्ज निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना शिंदे गटात खेचण्यासाठी त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी कोर्टाकडे दाद मागितली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, रमेश लटकेंना न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांचा अर्ज निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी, तसेच त्यांना शिंदे गटात खेचण्यासाठी त्यांचा राजीनामा स्विकारला जात नाही. २ सप्टेंबरला त्यांनी राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर राजीनामा आणण्यासाठी गेल्यानंतर राजीनामा चुकीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ३ ऑक्टोबरला पुन्हा राजीनामा दिला आहे. १ महिना आधी नोटीस दिली असातानाही राजीनामा मंजूर करू नये यासाठी असलेल्या दबावामुळे आयुक्त राजीनामा मंजूर करत नाहीत. शिंदे गटाकडून हा दबाल टाकला जात असून लटके यांनाही मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे. पण लटके कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. ते कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडणार नसल्याचे परब यांनी म्हटले आहे. राजीनामा का मंजूर केला जात नाही, याबाबत आयुक्तांकडे लेखी कारण मागितले आहे. पण त्यांच्याकडूनही कारण दिले जात नाही. अर्ज भरण्यासाठी २ दिवस शिल्लक असल्याने याप्रकरणी कोर्टाकडे दाद मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news