Weather Forecast : मान्सून जम्मू, चंदीगड, दिल्ली, जोधपूर या भागातून माघारी परतला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान, महाराष्ट्रात पुढचे ४ ते ५ दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आज (दि.१) आणि उद्या (दि.२) नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ५ ऑक्टोबर रोजी परभणी, नांदेडसह विदर्भासाठी यलो अलर्ट दिला आहे.
आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच कर्नाटकचा उत्तर भाग, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात यंदा पावसाने सर्वच भागांत जोरदार हजेरी लावल्याने महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी दुष्काळमुक्त ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा १९ टक्के अधिक, तर यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात ६१ टक्के इतका झाला आहे. तर सर्वात कमी सांगली जिल्ह्यात उणे २० टक्के पाऊस झाला आहे. मात्र, एकही जिल्हा दुष्काळग्रस्त नाही. यंदा राज्यात जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट दिसू लागले होते.
मात्र, जुलैच्या दुसर्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले. परिणामी, याच काळात पावसाने अधिक जोर धरला तो सप्टेंबरअखेर सुरूच आहे. त्यामुळे यंदा एकही जिल्हा दुष्काळग्रस्त राहिला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांत सरासरी २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ६१ टक्के, मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात ३४ टक्के, कोकणात पालघर जिल्ह्यात ३५ टक्के, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात ४६, तर विदर्भात वर्धा ५६ आणि नागपूरमध्ये ५५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. (Weather Forecast)
हे ही वाचा :