आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया | पुढारी

आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईने डेस्क : आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला. न्यायदेवतेकडून आम्हाला न्याय मिळेल, या श्रद्धेने आणि भावनेने आम्ही न्यायालयात गेलो होतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान शिवनेसेनेला (ठाकरे गटाला) देण्याचा निर्णय दिला. या नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.  यावेळी ते बोलत होते. दसरा मेळावा ही आमची गेल्या ५५ वर्षांची पंरपरा आहे. कोरोना महामारी वगळता त्यामध्ये कोणताही खंड पडला नव्हता. त्यामळे दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी वाजत-गाजत यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिकेने आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यामुळे ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेकडून कायदेतज्ज्ञ आस्पी चिनॉय यांनी, तर सदा सरवणकर यांच्यावतीने जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली.

दरम्यान, २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने ठाकरे यांना परवानगी दिली आहे. तर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणारा बीएमसीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. पक्षाच्या वादात जाण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो की, खरी शिवसेना कोण यावर आम्ही कोणतेही मत व्यक्त करणार नाही. खरी शिवसेना कोण हा मुद्दा निवडणूक आणि सर्वोच्चल न्यायालयासमोर असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. सत्याचा विजय कोर्टात झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. या निकालानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील अनेक भागांत जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचलंत का?

Back to top button