कास पठारावर आता पर्यावरणपूरक ई- बस; पर्यटनमंत्री लोढा यांच्या हस्ते लोकार्पण | पुढारी

कास पठारावर आता पर्यावरणपूरक ई- बस; पर्यटनमंत्री लोढा यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कास पठारावर पर्यावरणपूरक चार ई-बस तसेच बायोटॉयलेट सुविधेचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे लोकार्पण करण्यात आले. कासवर पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना लोढा म्हणाले, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारने तयार केलेल्या नवीन महाबळेश्वरच्या धोरणामध्ये कास पठारच्या विकासाला वाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावरील प्रदूषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदुषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखीन सुविधा तसेच नवीन पर्यटनस्थळांची निर्मिती करावी, असे ते म्हणाले.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बससेवा सुरु करण्यात येत आहे. या ई-बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळकडून उपलब्ध झालेल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून आणखीन ई-बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखीन उपाययोजना केले जातील, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button