शिंदे- फडणवीस सरकारविरोधात राज्यात असंतोष; ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट : शरद पवार | पुढारी

शिंदे- फडणवीस सरकारविरोधात राज्यात असंतोष; ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात 277 ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. यावरून राज्यात शिंदे – फडणवीस सरकारविरोधात असंतोष असल्याचे स्पष्ट होते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २१) मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत पवारांना यावेळी विचारले असता ते म्हणाले की, सरकारने लवकरात लवकर चौकशी करावी.

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी मध्यस्थी केली नाही, असा एकही प्रकल्प महाराष्ट्रात नाही. अनेक प्रकल्पांना दिशा देण्याचे काम पवारांनी केले आहे. पत्राचाळ प्रकरणी पवारांचा कोणताही संबंध नाही. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा, पणा पराचा कावळा करू नका, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कची मागणी केली आहे, या मागणीनंतर विलंब करणे योग्य नाही. दसरा मेळावाबाबत वाद वाढू न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. मुख्यमंत्र्यांना घोषणा कोण लिहून देते हे माहीत नाही. लिहून देणाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु मुख्यमंत्री निर्णय वाचून दाखवितात, असा टोला पवारांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. यावर पंतप्रधान आणि अन्य नेतेही याआधी बारामतीत येऊन गेले आहेत. सीतारमण यांच्या दौऱ्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे, अशी प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली. देशातील चित्र भाजपला अनुकुल नाही. देशातील परिस्थिती बघून भाजपने तयारी सुरू केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
देशात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आमचे सहकार्य राहील, आम्ही त्यांना मदत करू, विरोधकांची एकजूट यशस्वी झाली, तर देशासाठी चांगलं आहे, असे सांगून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button