फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार, राजकारण करू नका : उदय सामंत | पुढारी

फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार, राजकारण करू नका : उदय सामंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यात होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण करू नये, असे प्रतिउत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात पुण्याजवळ तळेगाव येथे होऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा तब्बल १.५४ लाख कोटींचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आता गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. त्यासाठीच्या सामंजस्य करारावर मंगळवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, ५ जानेवारीला कंपनीने सरकारला पत्र पाठविले होते. कंपनी येणार नाही, असा अहवालात उल्लेख आहे. जानेवारी ते जून २०२२ पर्यंत महाविकास आघाडी सरकारने काय केले? फॉक्सकॉन येणार नाही, अशीच मविआची मानसिकता होती. फॉक्सकॉन प्रकल्प गेला याचे आम्हालाही दु:ख आहे. पण महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अश्वासन दिले आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत पंतप्रधानांची याबाबत भेट घेणार आहे. त्यामुळे विरोधकांनी मतांसाठी व राजकारणासाठी काहीही आरोप करू नका, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

सामंत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने सहा महिन्यापूर्वी हाय पावर मीटिंग घेऊन पॅकेजचा निर्णय घेतला असता तर फॉस्ककॉन व वेदांताच्या सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातला गेला नसता.  चर्चा, परदेश दौरे करून उद्योजक प्रकल्प राबविण्यासाठी तयार होत नाही. त्यासाठी हाय पॉवर कमिटीची मीटिंग घ्यावी लागते, ही मीटिंग १५ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि ३९ हजार कोटींचे पॅकेज कंपनीला जाहीर केले.

तरी देखील कंपनीने गुजरातला प्रकल्प गेल्याचे दुःख असून याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचाही चर्चा केली. त्यावेळी या प्रकल्प पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असे मोदी यांनी आश्वासन दिले आहे, आमचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे, असे सामंत यांनी सांगून विरोधकांनी राजकारणासाठी राजकारण न करता कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन केले. मुंबईत एक आणि मतदार संघात दुसरी भूमिका घेणे योग्य नसल्याची टीका सामंत यांनी नाव न घेता खासदार विनायक राऊत यांच्यावर केली.

हेही वाचा :

Back to top button