चंद्रपूर : गणेश भक्तांवर लाठीमार, पोलिस शिपाई निलंबित | पुढारी

चंद्रपूर : गणेश भक्तांवर लाठीमार, पोलिस शिपाई निलंबित

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्तांवर लाठीमार करणाऱ्या एका पोलीस शिपायाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. शिवाय या प्रकरणाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. शुक्रवारी चंद्रपूर शहरातील गणरायाला निरोप देताना निघालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील मुख्य मार्गावर ही घटना घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, दरवर्षीप्रमाणे चंद्रपुरात गणरायाचे थाटात आगमन झाले. अनेक मंडळांनी विविध देखाव्यांसह गणरायायाची आठवडाभर मनोभावे पूजाअर्चा केली. काल शूक्रवारी चंद्रपूर शहरातील गणेश मंडळांनी गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली. पोलिस प्रशासनानेही विसर्जन मिरवणूक रॅलीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काल सायंकाळपासून पोलीस बंदोबस्तात विसर्जन मिरवणुकीला सूरूवात झाली. गणेश विसर्जनाची निघालेली मिरवणूक रॅली शहरातील जयंत टॉकीज चौकात पोहचली. त्यावेळी जटपुरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची मिरवणूक तिथे पोहचली. मात्र समोरील मंडळाला डावलून मागे असलेल्या गणेश मंडळाला पोलिसांनी पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.  याबाबत चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी अरेरावी करून वाद घातल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.

तसेच वातावरण तणावपूर्ण झाले उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वरिष्ठांना कुठलीही माहिती दिली नाही. तसेच आदेश नसताना थेट चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्ते व गणेश भक्तांवर लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र गणेश भक्तांनी संयम बाळगत पुढची वाट धरली व जटपुरा गेट जवळ पोहचताच चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले व सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करून विनाकारण लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा येथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आंदोलनस्थळी दाखल झाले व सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याचे आवाहन करून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली. मात्र आंदोलनकर्त्या भक्तांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी रेटून धरली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचारी आदेश रामटेके याला निलंबित केले. व घडलेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना आदेश दिले. घटनास्थळी नेमके काय घडले? याची सखोल चौकशी करण्यासाठी जयंत टॉकीज चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. अखेरीस चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेत विसर्जन सुरळीतपणे संपन्न होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेतल्याने विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पुढे निघाल्या.

हेही वाचलंत का ?

Back to top button