कचरा कुंडीत फेकलेल्या नवजात बाळाची खाकी वर्दी बनली 'माय' | पुढारी

कचरा कुंडीत फेकलेल्या नवजात बाळाची खाकी वर्दी बनली 'माय'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बोरिवली येथील कचरा कुंडीत आढळून आलेल्या नवजात बाळाची खाकी वर्दीच माय बनणार आहे. त्या बाळाचे नाव एमएचवी पोलीस ठाण्याची मुलगी असे ठेवले जाणार आहे. मुलीच्या भविष्याचा विचार करून पोलीस तिच्या नावाने पैसे बँकेत ठेवणार आहेत. त्या पैशातून मुलीचे शिक्षण देखिल केले जाणार आहे.

बोरिवली पश्चिमच्या शिवाजी नगर येथील साईबाबा मंदिराजवळ दोन दिवसांपूर्वी अज्ञात महिलेकडून बाळ कचराकुंडीत फेकून देण्यात आले. कचराकुंडी शेजारी असलेल्या बॅटरी दुकानाच्या मालकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता कचराकुंडीजवळ कपड्यात गुंडाळलेले बाळ दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत एमएचबी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक शोभा यादव मौले या घटनास्थळी आल्या. पोलिसांनी त्या बाळाला कचराकुंडीतून बाहेर काढले. काही तासापूर्वी जन्म झालेल्या त्या बाळाची नाळदेखील कापली नव्हती.

पोलिसांनी त्या बाळाला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. बाळाच्या संगोपनाबाबत पोलिसांनी बालकल्याण समितीला पत्र व्यवहार केला आहे. बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बालकल्याण समितीकडे हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्या बाळाला अंधेरी येथील एका संस्थेत ठेवले जाणार आहे. बाळाचे नामकरण केले जाणार असून तिच्या भविष्यासाठी पोलिसांनी काही रक्कम गोळा करण्यास सुरुवात केल्याचे उपनिरीक्षक वनिता कातवने यांनी सांगितले. ती रक्कम पोलीस बँकेत एफडी म्हणून ठेवण्यात येणार आहे. एमएचवी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा :

Back to top button