भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडिता पोलिसांना न सांगता ठाण्यातून बाहेर पडली : देवेंद्र फडणवीस | पुढारी

भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडिता पोलिसांना न सांगता ठाण्यातून बाहेर पडली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : भंडाऱ्यातील बलात्काराची घटना लाजिरवाणी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सांगितले. भंडारा प्रकरणातील बेजबाबदार पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. भंडारा प्रकरणाचा तपास होणार, असेही निवेदन त्यांनी विधान परिषदेत दिले.

फडणवीस म्हणाले, पीडितेनं महिला पोलिसांना गुन्ह्याची कल्पना दिली नाही. खाण्यासाठी पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर पीडितेवर अत्याचार झाला. धमकी देऊन महिलेवर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी पीडितेला शोधण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत पीडितेसोबत घडलेल्या प्रसंगाची फडणवीसांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

काय आहे भंडारा प्रकरण? 

महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील दोघांचे निलंबन तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्‍यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात महिलेवर अत्याचार झाल्यानंतर वाहन चालकाने तिला रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर ही महिला भटकत लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली होती. ती एका पुलाखाली एकटी बसून असताना महिला पोलीस पाटलांनी ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला लाखनी पोलीस ठाण्यात आणले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. पीडित महिला प्रचंड घाबरलेली आणि बोलण्याच्या स्थितीत नव्हती.

पीडित महिलेला पोलीस ठाण्यातील महिला कक्षात ठेवण्‍यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ती कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर कन्हाळमोह परिसरात तिच्यावर पुन्हा दोघांनी अत्याचार केला. लाखनी पोलिसांनी नियमानुसार तिला महिला वसतीगृहात ठेवले असते तर पुढील अनर्थ टाळता आला असता.

Back to top button