

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: गणरायाचे आगमन आठ दिवसांवर आले असल्याने अमर कॉटेज परिसरातील कै. दत्तानाना बनकर क्रीडांगणामध्ये गणपती विक्रीचे स्टॉल सज्ज झाले आहेत; मात्र मैदानात पसरलेली अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव यामुळे स्टॉलधारकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने बनकर मैदानात गणपती स्टॉलधारकांना काही भाडे आकारून येथे स्टॉल लावण्याची परवानगी दिली. या स्टॉलमधून पालिकेला मोकळ्या जागेचे लाखो रुपये उत्पन्न मिळणार आहे; मात्र सुविधा देण्याच्या नावाने अक्षरशः बोंब आहे. कारण या मैदानात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. पाण्याअभावी स्वच्छतागृहाची स्वच्छता होत नाही.
मैदानाच्या गेटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर तळीरामांनी ठाण मांडले आहे. या गवतामुळे सापही आढळत असून, डासांचेही प्रमाण मोठे आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या स्वच्छतागृहाचे पाणी बनकर मैदानात पसरल्याने सबंध क्रीडा मैदानात घाण पसरून परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. या सर्वांचा त्रास मूर्ती खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनाही होत आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी करूनही या मैदानाच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले. किमान गणपती स्टॉलधारकांकडून भाडे घेतात, हे लक्षात घेऊन तरी हडपसर पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज होती. मात्र, फक्त स्टॉलधारकांच्या पावत्या गोळा करणे एवढीच मोहिम पालिकेकडून राबवली जात आहे.
सुरक्षारक्षकांचेही हाल
सुरक्षारक्षक असूनही मैदानाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या सुरक्षारक्षकांना बसायला एखादे शेडही नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांचेही हाल होत आहेत. अनेक वेळा सायंकाळच्या दरम्यान सुरक्षारक्षकांना मारहाण झाली आहे. याकडे ना पालिका लक्ष देते, ना लोकप्रतिनिधी.
अमर कॉटेज परिसरातील कै. बनकर क्रीडांगणावर गवत वाढले आहे. येथे पाणी नसल्याने स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता होत नाही. परिणामी, येथे येणार्या ग्राहकांसह स्टॉलधारकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे.
दत्तात्रय पोखरे, दत्ता कदम, गणपती स्टॉलधारक
अमर कॉटेज परिसरातील क्रीडा मैदानात सुमारे 15 ते 20 गणपती स्टॉलधारक आहोत. येथे प्रतिफूट भाडे 5 हजारांपासून पुढे आकारले जाते. डिपॉझिट 60 हजार घेतले जाते. मात्र, अद्याप येथे ना लाईट आहे, ना रात्री सुरक्षारक्षक. मैदानाची दोन्ही गेट खुलीच असतात. लाईटची व्यवस्थाही आम्हीच केली आहे. स्वच्छतागृह व साफसफाई केली, तरच आम्ही भाडे देणार आहोत.
शेखर कामठे, अभिजित शिवरकर, गणपती स्टॉल धारक.
कै. दत्तानाना बनकर क्रीडा मैदानात वाढलेले गवत व स्वच्छतागृहाची स्वच्छता लवकर करून घेतली जाईल.
प्रसाद काटकर, सहायक महापालिका आयुक्त, हडपसर