Mumbai Bihar Bhavan: मुंबईत उभं राहणार 30 मजली ‘बिहार भवन’! 314 कोटी मंजूर, बिहारी नागरिकांना होणार फायदा
Mumbai Gets Bihar Bhavan: मुंबईत येणाऱ्या बिहारी नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आधुनिक सुविधांनी सज्ज ‘बिहार भवन’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांसह अनेकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
हे बिहार भवन मुंबईतील एलिफिंस्टन एस्टेट परिसरात, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत उभं राहणार आहे. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर ही इमारत उभारली जाणार आहे. यासाठी बिहार सरकारच्या मंत्रिपरिषदेनं 13 जानेवारी रोजी 314 कोटी 20 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
30 मजली इमारत
उपलब्ध माहितीनुसार, हे बिहार भवन सुमारे 2752.77 चौरस मीटर (सुमारे 0.68 एकर) जागेवर उभारण्यात येईल. बेसमेंटसह ही इमारत सुमारे 30 मजली असेल आणि जमिनीपासून तिची उंची सुमारे 69 मीटर असेल. आधुनिक वास्तुकलेचा वापर करून या इमारतीचे डिझाइन तयार केले जाणार आहे.
178 खोल्या, सरकारी कामांसाठीही सुविधा
या बिहार भवनात एकूण 178 खोल्या असणार आहेत. मुंबईत सरकारी कामासाठी, बैठकींसाठी किंवा अधिकृत कारणांसाठी येणाऱ्या बिहारमधील नागरिकांना येथे राहण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय विविध विभागांसाठी कार्यालयं आणि आधुनिक हॉलचीही उभारणी केली जाणार आहे.
रुग्ण आणि नातेवाईकांसाठी 240 बेडची डॉर्मेट्री
मुंबईत विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी बिहारमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन येथे 240 बेड क्षमतेची डॉर्मेट्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना सुरक्षित, सोयीस्कर आणि तुलनेने किफायतशीर राहण्याची सुविधा मिळणार आहे.
233 वाहनांसाठी स्मार्ट पार्किंग
मुंबईत पार्किंगची मोठी समस्या असते. त्यामुळे या इमारतीत सेंसर आधारित स्मार्ट ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये एकाच वेळी 233 गाड्या पार्क करता येतील, अशी सुविधा असेल.
विद्यार्थ्यांनाही होणार फायदा
फक्त उपचारासाठीच नाही, तर अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही इथे राहण्याची सोय असेल. मेडिकल, इंजिनिअरिंग, बँकिंग, रेल्वे, यूपीएससी किंवा इतर परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे किफायतशीर दरात सुरक्षित निवासाची सोय असणार आहे.
कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया आणि मेडिकल रूम
या बिहार भवनात 72 जण बसू शकतील असा कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि इतर आवश्यक सोयी विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे सरकारी बैठकांसोबतच सर्वसामान्य लोकांनाही फायदा होणार आहे.
दरम्यान, संबंधित विभागाच्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया (टेंडर) सुरू करण्यात येणार आहे. एकूणच मुंबईत येणाऱ्या बिहारमधील नागरिकांसाठी हे बिहार भवन महत्त्वाचे असणार आहे.

