

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दुःख आहे. पण म्हणून खचून जाणारे आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. तसेच मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असे दिसले तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. दरम्यान, निवडणूकीत काय चुकले, काय कमी पडले याचे सर्व मिळून विश्लेषण आणि कृती करूच. पण नव्याने कामाला लागून पक्ष आणि संघटना पुन्हा उभी करूया, असे आवाहनही राज यांनी केले.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकेत मनसेची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करूनही मुंबईत मनसेचे फक्त सहा उमेदवार निवडून आले.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज ’एक्स’ या समाज माध्यमातून पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली आहे. ते म्हणाले, यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकत्र्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. ही लढाई हेच आपले अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचे भान तुम्हा सगळ्यांना आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. तसेच राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी विजयी नगरसेवकांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मराठी हाच श्वास
मुंबई महानगर प्रदेश परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभे रहायचे आहे. निवडणुका येतील जातील. पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचे नाही, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे.
पैसे वाटून मते घेतली नाहीत!
मनसेचे उमेदवार कमी जिंवून आले असले तरी आम्ही पैसे वाटून मते घेतलेली नाहीत. कमळाच्या पाकिटातून आणि शिंदे गटाकडून पैशांची पाकिटे आणि पोती दाखवली जात होती. पण आमच्याकडून पैसे वाटताना एकही पकडला गेला नाही, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजप व शिंदे सेनेवर घणाघाती हल्ला चढवला.