गणेशोत्सव : गणपती येवची वेळ झाली…! | पुढारी

गणेशोत्सव : गणपती येवची वेळ झाली...!

मुंबई; संजय कदम : गणेशोत्सव साठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अधिक सुखकर होणार अशी खमंग घोषणा राजकीय लाभार्थी करीत असले तरी त्याबाबत अद्याप कोणतेही ठोस धोरण जाहीर झालेले नाही.

प्रशासनाने मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या 72 तास आधी कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचा किंवा दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने चाकरमानी कमालीचे संतप्त आहेत.

गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही गणेशोत्सवासाठी जाऊ शकलो नाही, किमान यंदातरी आमच्यावर जाचक अटी लादू नका, अशी रास्त भावना चाकरमानी व्यक्त करीत आहेत.

मुंबईत एकतर सर्वत्र लसीकरणाचा घोळ सुरू आहे. लस घेण्याची इच्छा असूनदेखील लस मिळत नाही. गेल्या वर्षी 14 दिवस घरगुती विलगीकरणाची सक्ती किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असला तरच गावात प्रवेश करण्याची कठोर अट असल्याने बहुसंख्य चाकरमान्यांनी गावी जायच्या बेतावर पाणी सोडले होते.

यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरीही आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल तरच गावात प्रवेश देण्याची जाचक अट घालण्यात आली आहे.

गणेशोत्सव करिता राज्य परिवहन मंडळाने मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस सोडण्याचे जाहीर केले. रेल्वेनेदेखील कित्येक जादा रेल्वेगाड्या जाहीर केल्यानंतर दोन महिने अगोदरच प्रवाशांनी बस व रेल्वेचे बुकिंग केले.

हे सर्व माहीत असूनदेखील गणेशोत्सव अवघे काही दिवस शिल्लक असतानादेखील शासनाकडून ठोस धोरण जाहीर न झाल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.

शारीरिक अंतर ठेवणे, मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत. ते आम्ही पाळायलाही तयार आहोत पण आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक नको, असे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहेत चाकरमान्यांच्या मागण्या?

* आरटीपीसीआरचे बंधन नको.

* कोल्हापूरमार्गे जाणार्‍यांना टोलमाफी

* खासगी गाडीतून पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याची मुभा.

* विलगीकरण नको.

* मुंबई-गोवा महामार्गाची तातडीने दुरुस्ती.

तपास नाक्यावर गोंधळ उडण्याची शक्यता

ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत किंवा ज्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे ते सुखासुखी घरी जातील. पण ज्यांच्याकडे चाचणी अहवाल नाही त्यांचे काय ? या लोकांची चाचणी करुन त्यांना पुढे पाठवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला तरी ते कितपत शक्य आहे ? त्यात किती वेळ जाईल. ही चाचणी मोफत होणार का? यावेळी लहान मुलेे आणि वृद्धांची नेमकी कशी काळजी घेतली जाणार हे प्रश्न आहेतच.

गावी जाण्यासाठी चाकरमानी महिना दोन महिने आधीच बस व रेल्वेचे आरक्षण करतात. आरटीपीसीआर चाचणीची घोषणा सरकारने तेव्हाच करायची होती. टास्कफोर्सच्या तालावर नाचणारे हे सरकार उद्या गावावरून निघतानाही चाचणी करायचाही फतवा काढील. सरकारला जनतेची जर एवढी काळजी आहे तर सरकारने या चाचण्या मोफत कराव्यात, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार, यांनी केली आहे.

गाड्यांची वेटिंगलिस्ट

यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वे 175 तर पश्चिम रेल्वेतर्फे 42 जादा गाड्या चालविण्यात येणार आहे. याशिवाय नेहमीच्या गाड्यादेखील धावणार आहेत. यातील काही गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. तर काही गाड्यांची वेटिंग लिस्ट 200 ते 250 च्यावर गेली आहे. खासकरुन 9 सप्टेंबर रोजी धावणार्‍या सर्व गाड्याची तिकिटे वेटिंगची आहेत. शिवाय एसटीने 2200 यंदा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसादही चांगला आहे. एकूण काय तर गावी जायचेच असा चंग चाकरमान्यांनी बांधला आहे.

दुहेरीकरणाचाही बसणार फटका

21 ते 30 ऑगस्ट दरम्यान रोहा ते वीर सेक्शन दरम्यान दुहेरीकरणाचे काम करण्यात येत होते. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या होत्या. तर काही गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. तसेच काही गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत न चालविता मधल्या स्थानकावर रद्द करण्यात आल्या. हीच भीती चाकरमान्यांना वाटते. गणपतीपूर्वी हे काम पूर्ण झाले नाहीतर ? त्यापेक्षा रोड प्रवास परवडला अशी भावना निर्माण झाली आहे. साहजिकच मुंबई-गोवा हायवे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या मार्गावरही अधिक भार येणार आहे.

Back to top button