२६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज | पुढारी

२६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; रायगड समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी क्रमांकावरून हा धमकीचा मेसेज आला आहे. धमकी सोबतच, जर त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. तर, ते भारताबाहेरचे दाखवले जाईल आणि धमाका मुंबईत होईल. भारतात सध्या ६ लोक आहेत. जे हे काम पूर्ण करतील. असेही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची नोंद करुन मुंबई पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. त्यासोबतच राज्य दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) अन्य तपास यंत्रणांनाही याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर १६ मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती. ज्यावर तीन एके-४७ रायफल आणि ६०० काडतुसे सापडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button