मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील 46 हजार झाडे गेली कुठे ! | पुढारी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील 46 हजार झाडे गेली कुठे !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेस वे) आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावर एक लाख वृक्ष लावण्यात आले होती. परंतु प्रत्यक्षात एक्सप्रेस वे वर 49 हजार 34 तर जुना मुंबई-पुणे महामार्गावर 15 हजार असे एकूण 64 हजार 34 वृक्ष आहेत. तर मग उर्वरित 46 हजार झाडे कुठे गेली, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रवक्‍ते मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.  मुंबई- पुणे एक्सप्रेस वे बांधला जाणार होता. त्यावेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठी विरोध केला होता. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जाणार नाही, अशी भिती व्यक्त केली होती. एक्सप्रेस वे च्या निर्मितीसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. भारतीय रोड काँग्रेसनुसार 93 किमी अंतरात एक लाख वृक्ष लावणे, त्याची देखभाल दुरुस्ती करुन त्यातील किमान 80 टक्के वृक्ष जगेल याची काळजी घेणं  तसेच हे काम दोन वर्षात पूर्ण करणे बंधनकारक होते. त्यासाठी आयडिअल रोड बिल्डरशी करार करण्यात आला होता.

माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीमध्ये 2005 मध्ये एक लाख वृक्ष लावल्याची माहिती देण्यात आली. सन 2011 पर्यंत वृक्षांची संख्या ही एक लाख होती. तर 2022 मध्ये एक्सप्रेस वे 49 हजार 35 तर जुना मुंबई-पुणे महामार्गावर 15 हजार  वृक्ष असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक लाखातील उर्वरित 46 हजार झाडे कुठे गेली, असा सवाल किर्दत यांनी उपस्थित करत याची जबाबदारी निश्‍चित करुन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.

वृक्षांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली

जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि एक्सप्रेस वे वर 64 हजार वृक्ष असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, नजर मोजणी केली तरी, ही संख्याही फुगवलेली असल्याची दिसून येईल. दर वर्षी वृक्षांची संख्या वाढणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ती कमी होत गेली हे चिंतेची बाब आहे.

सव्वा पाच हजार वृक्षांवर पडणार कुर्‍हाड

एक्सप्रेस वे वर आवश्यक वृक्षांची संख्या नाही. असे असताना आता द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा 13.3 कि मी लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पाच हजार 300 वृक्षांवर कर्‍हाड चालवली जाणार आहे. तर या बदल्यात 48 हजार वृक्ष लावणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या विषयाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहणार का, असा सवाल किर्दत यांनी उपस्थित केला आहे.

Back to top button