पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस : पालघरमधील जुळ्या बालकांच्या मृत्यूच्या घटनेचा मुद्दा विधानसभेत; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले | पुढारी

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस : पालघरमधील जुळ्या बालकांच्या मृत्यूच्या घटनेचा मुद्दा विधानसभेत; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : पालघर जिल्ह्यातील महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेचा मुद्दा विरोधी पक्ष नेते अजीत पवार यांनी विधानसभेत मांडला. अपुऱ्या सुविधांमुळे जुळ्या बालकांचा मृत्यू होणे ही लाजीरवाणी घटना असल्याचे त्यांनी म्हटले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा घटना दुर्देवी असल्याचे सांगत शासन लवकरात लवकर सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करेल असे अश्वासन दिले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यसरकारविरोधात महाविकासआघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांच्या घोषणांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर पोहोचताच महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. ५० खोके एकदम ओके, आले आले गद्दार आले अशा घोषणांमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची सूचना गटाच्या आमदारांना केली.  तसेच सरकारकडून बुधवारी विधीमंडळात २५ हजार ८२६ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. यावरूनही विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे आजही विरोधक व शिंदे गट यांच्यात जोरदार संघर्षाची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते अजीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी बुधवारी ओल्या दुष्काळाची मागणी  लावून धरली. आजही अजीत पवार या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button