पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. यापूर्वी अजित डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. राजभवन मुंबई येथील भेटीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण या अचानक भेटीमागचे कारण आणि यादरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
अजित डोवाल हे भारताच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ते सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अजित डोवाल अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस महासंचालक यांचीही भेट घेणार आहेत.