राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर | पुढारी

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मतदान 18 सप्टेंबर रोजी होणार असून, यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मिळून सरपंचांची निवड करणार नाहीत. थेट मतदारच सरपंचांची निवड करणार आहेत. गावकर्‍यांच्या हातात कारभार्‍याची दोरी असणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्‍त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली. मदान म्हणाले की, जिथे अधिक पाऊस आहे, तिथे या निवडणुका नाहीत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींतून या निवडणुका होतील. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल. 51 तालुक्यांतील संबंधित गावांतून शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल.

  • 18 सप्टेंबर रोजी मतदान, तर 19 सप्टेंबरला निकाल
  • येत्या 24 ऑगस्टपासून नामांकन पत्रे भरण्यास प्रारंभ, आयोगाची घोषणा
  • नांदेड जिल्ह्यातील माहूर 24, किनवट- 47 ठिकाणी निवडणुका होणार

विविध जिल्ह्यांत होणार्‍या निवडणुका

यवतमाळ : बाभुळगाव 2, कळंब 2, यवतमाळ 3, महागाव 1, आर्णी 4, घाटंजी 6, केळापूर 25, राळेगाव 11, मोरगाव 11 व झरी जामणी 8, नांदेड : माहूर 24, किनवट 47, अर्धापूर 1, मुदखेड 3, नायगाव (खैरगाव) 4, लोहा 5, कंधार 4, मुखेड 5 व देगलूर 1, हिंगोली : (औंढा नागनाथ) 6 , परभणी : जिंतूर 1 व पालम 4 , लातूर : अहमदपूर 1

निवडणूक कार्यक्रम

  • संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.
  • नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 दरम्यान दाखल करण्यात येतील.
  • सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
  • नामनिर्देशनपत्रांची (उमेदवारी अर्ज) छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल.
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
  • मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
  • मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल.

हेही वाचा

Back to top button