

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : वृद्ध भूमिहीन संघटनेच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदारांची बदली करावी, संजय गांधी निराधार योजनांचा तातडीने लाभ मिळावा, आदी मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कर्जत बाजारतळ येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेमध्ये झाले. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष शब्बीर पठाण यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, सचिन सोनमाळी, संघटनेचे उपाध्यक्ष किसन शिंदे, सय्यद काटेवाले, गंगा बोरुडे, इंनताज शेख, बशाभाई हवालदार, हिरालाल कोकाटे, हरिभाऊ कोकाटे, गणेश जंजिरे, उमेश तापकीर आदी उपस्थित होते. यावेळी शब्बीर पठाण म्हणाले की, संजय गांधीची बैठक होऊन तीन महिने झाले, तरी दुसरी बैठक अद्याप झालेले नाही. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तीन महिने झाले, तरी मानधन मिळालेले नाही. त्यामुळे तातडीने मानधन देण्यात यावे. याचप्रमाणे कामगार तलाठी यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी गोरगरीब नागरिकांची अडवणूक करण्यात येत आहे.
सर्कलने शिफारस करूनही अनेकांना दोन दाखले मिळत नाहीत. या सर्व प्रकारासाठी जबाबदार असणार्या संबंधित विभागाच्या नायक तहसीलदार यांची अन्यत्र बदली करण्यात यावी, गोरगरीब नागरिकांना नवीन व डुप्लिकेट शिधापत्रिका मिळत नाहीत, त्यासाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष किसन शिंदे म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील सर्व नागरिक खर्याअर्थाने निराधार झाले आहे. दोन आमदार असताना देखील कर्जत तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सुटत नाही भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण अशी परिस्थिती झाली आहे.
नाशिक कार्यालयापर्यंत जाऊन आलो, तरी देखील कोणीही दखल घेत नाही. या कार्यालयामध्ये गोरगरीब नागरिकांची अडवणूक होत आहे. आर्थिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय कोणतीही काम या ठिकाणी होत नाही, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. तालुक्यातील ग्रामसेवक कामगार तलाठी हे मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करीत असून त्यांच्यावर कोणाचीही नियंत्रण नाही, असाही आरोप शिंदे यांनी केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, गंगा बोरुडे, सय्यद काटेवाले यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.संघटनेच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.