Varsha Raut : वर्षा राऊत यांची चौकशी सुरु | पुढारी

Varsha Raut : वर्षा राऊत यांची चौकशी सुरु

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून ०६ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार वर्षा राऊत या शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ईडीसमोर हजर झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील ईडी कार्यालयात गेली आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या सुमारे ०१ हजार ४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली असून ते सध्या ईडी कोठडीत आहेत. ईडीचे अधिकारी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांना संजय राऊत यांच्या समोर बसवून समोरासमोर चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळेच येत्या काळात संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Varsha Raut : कसून चौकशी 

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यातील ११२ कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाले. प्रवीण राऊतांच्या कंपनीतून ०१ कोटी ०६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले. घोटाळ्यातील याच पैशांतून दादर येथील फ्लॅटसह अलिबागमध्ये १० जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने राऊतांवर ठेवला आहे. त्यानुसार ईडीचे अधिकारी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.

ईडीने पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या दादर येथील राहत्या घरासह अलिबाग येथील जमीन अशी तब्बल 11.15 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने अटक आरोपी प्रविण राऊत यांच्या पालघर, सफाळे, पडघा येथील जमीनी, सेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि वर्षा राऊत व सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या भागीदारीतील किहीम, अलिबागमधील जमिनी यांच्यावरही कारवाई केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button