India@75 : टिळकांना 'या' दोन अग्रलेखांमुळे झाली होती ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा | पुढारी

India@75 : टिळकांना 'या' दोन अग्रलेखांमुळे झाली होती ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकमान्य टिळक यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ही सर्वश्रुत आहे. लोकमान्य टिळकांच्या विरोधात ब्रिटिश सरकार आकसातून केलेले कारवाई, त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी उभे करण्‍यात आलेले  खोटे पुरावे आणि न्यायमूर्तीही कशा प्रकारे द्वेषबुद्धीने काम करते याचे उदाहरण म्हणजे हा खटला हाेता. या खटल्यासंदर्भातील सविस्‍तर तपशील भा. द. खेर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक दर्शन या ग्रंथात आलेले आहे.

लॉर्ड कर्झन याने बंगलाची फाळणी केल्यानंतर, त्याला देशभरातून विरोध होत होता. १९०८मध्ये ही चळवळ कळसाला पोहोचली होती. मुझफरपूरमध्ये ३० एप्रिल १९०८ ला खुदीराम बोस यांनी त्या वेळचे सेशन जज्ज किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर बाँब फेकला होता. यात दोन स्त्रीयांचा मृत्यू झाला. त्या वेळेच्या इंग्रज धार्जिण वृत्तपत्रांनी या घटनेला काँग्रेस पक्षातील जहाल गटाला जबाबदार धरायला सुरुवात केली.
या वृत्तपत्रांना उत्तर देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरीतून जोरदार हल्ला चढवला होता. ‘देशाचे दुर्दैव’ आणि ‘हे उपाय टिकणारे नाहीत’ या दोन लेखांमुळे ब्रिटिश सरकार चिंतेत होते. मुंबईच्या गव्हर्नरनी या दोन्ही अग्रलेखांचे भाषांतर करून घेतले. त्यानंतर टिळकांवर कलम १२४ अ आणि १५३ – अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

‘देशाचे दुर्दैव’ या अग्रलेखात देशातील नागरिकांत सरकारविषयक द्वेष आणि तिरस्कार उत्पन्न झाला, त्यामुळे हा राजद्रोहाचा गुन्हा होय, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर टिळकांना अटक झाली. अटकेनंतर हे उपाय टिकणार नाहीत, या लेखावरून त्यांच्याविरोधात दुसरे पकड वॉरंट काढण्यात आले.

टिळकांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे चोर, दरोडेखोर होते. २ जुलैला टिळकांच्यावतीने जामीन अर्ज उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. टिळकांचे वकील बॅरिस्टर महंमदअली जिना होते. “१८९७ला टिळकांवर याचा कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी टिळकांना जामिनावर मुक्त केले होते. तसेच जोपर्यंत आरोपीवर खटला सुरु असताना तो दोषी ठरेपर्यंत निरपराधी आहे, असे कोर्टाने समजून चालले पाहिजे,” असा युक्तीवाद जिना यांनी मांडला. पण हे दोन्ही युक्तिवाद न्यायमूर्ती दावर यांनी फेटाळले. विशेष म्हणजे १८९७च्या खटल्यात खुद्द दावर टिळकांचे वकील होते.

१३ जुलैला खटल्यातील पुरावे घेण्यास सुरुवात झाली. आपण लिहिलेल्या लेखांचा अर्थ ज्युरींना समजवून देण्यासाठी टिळकांनी स्वतःच खटला चालवण्यास सुरुवात केली. मूळ लेख आणि त्यांचे इंग्रजी भाषांतर यातील तफावतीवर टिळकांनी लक्षात आणून दिली. या दोन गुन्ह्यात टिळकांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल २२ जुलैला रात्री दहा वाजता सुनावण्यात आला होता.

टिळकांना शिक्षा सुनावल्यानंतर पुढे ८ दिवस विविध ठिकाणी दंगली उसळल्या. मुंबईच्या असंख्य कामगारांनी संप पुकारला. पोलिसांनी परिस्थिती काबुत ठेवणे कठीण झाल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले, असे लोकमान्य टिळक दर्शन या ग्रंथात नमूद केले आहे. सुरुवातीला काही दिवस टिळकांना साबरमती येथील कारावासात ठेवण्यात आले. नंतर १३ सप्टेंबरला टिळकांना तेथून हलवण्यात आले. टिळकांना मंडाले येथील तुरुंगात पाठवण्यात आले. या तुरुंगात टिळकांना फार त्रास सहन करावा लागला. याच तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

 

 

 

Back to top button