पुणे : साडेसात हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन; ‘संयम’चा पुढाकार | पुढारी

पुणे : साडेसात हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन; ‘संयम’चा पुढाकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 7300 हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद… त्यासाठी 200 प्रशिक्षकांनी शहरातील 56 शाळांमध्ये आयोजित केलेले 1033 हून अधिक कार्यक्रम… याद्वारे सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. किशोरवयीन मुला-मुलींना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी ‘संयम’ प्रकल्पाअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून पुढाकार घेण्यात आला आहे. अभ्यास संशोधन अहवालाच्या माध्यमातून ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 13 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता परावृत्तीसाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.

यामध्ये आरोग्य, धूम्रपान आणि मद्यपानाची सवय, इंटरनेटचे व्यसन, गुड आणि बॅड टच अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘संयम’मधील प्रशिक्षकांतर्फे ‘अ‍ॅडिक्शन टेस्ट’, ‘माय नॉलेज, माय हेल्थ टेस्ट’, ‘इमोशनल रेग्युलर टेस्ट’ अशा विविध कसोट्यांच्या माध्यमातून विश्लेषण करण्यात आले आहे. ‘अ‍ॅडिक्शन टेस्ट’नुसार, 66 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये व्यसनाधीनतेबद्दल अनेक गैरसमज होते. प्रशिक्षण कार्यक्रमांनंतर हे गैरसमज दूर होण्यास मदत झाली. यामध्ये 29 टक्के विद्यार्थ्यांचे वागणे अयोग्य असल्याचे आणि त्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. ‘माय नॉलेज, माय हेल्थ टेस्ट’मध्ये 69 टक्के मुलांना लैंगिक विषयाशी संबंधित प्रश्नांची, समस्यांची उत्तरे मार्गदर्शनानंतर मिळाल्याचे निदर्शनास आले.

संयम अर्थात ‘होप, इफिकसी, रेझिलियन्स, ऑप्टिमिझम’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही 15 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. यासाठी 300 स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले आहे. मात्र, पुण्यातील तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असून, त्यासाठी संयम इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात येत आहे.

                                    नंदकिशोर राठी, विश्वस्त, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट

Back to top button