जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या प्रतीक्षालयाला टाळे; शिवभोजन थाळी फक्त फलकावर | पुढारी

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या प्रतीक्षालयाला टाळे; शिवभोजन थाळी फक्त फलकावर

बलभीम भोसले

दापोडी: गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या काळजीसाठी नातेवाईकही रुग्णांबरोबर रुग्णालयात येतात. मात्र, प्रतीक्षालयाला टाळे लावले असल्यामुळे त्यांना ऊन-पावसामध्ये उघड्यावर विश्रांती घ्यावी लागत आहे. तसेच, रुग्णालय परिसरात दहा रुपयांत मिळणार्‍या शिवभोजन थाळीचे अनेक फलक उभारले असले तरी प्रत्यक्षात शिवभोजन मिळत नसल्याचे दिसत आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या दिमाखात नवी सांगवीत रुग्णालय उभारण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक निधी अंतर्गत सन 2018-19 साली 22 लाख 6 हजार 188 रुपये खर्च करून रुग्णालयात प्रतिक्षालय उभारण्यात आले आहे. सध्या प्रतिक्षालय बंद अवस्थेत असून दोन्हीही दरवाजांना टाळे लागले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना बंद प्रतिक्षालय पहावे लागत आहे. प्रतिक्षालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे.
रुग्णालयात पुणे जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. दूरचे अंतर असल्यामुळे रूग्णांबरोबर नातेवाईकांना उपस्थित राहवे लागते. रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांची फरफट होत आहे. नातेवाईकांना उघड्यावर झोपण्याची वेळ आली आहे. नातेवाईक रुग्णांना रुग्णालयात दाखल करतात. मात्र, उपचार पूर्ण होईपर्यंत थांबायचे कुठे? हा एकच प्रश्न निर्माण होतो.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. डासांचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांच्या अनेक नातेवाईकांना दिवस-रात्रभर उघड्यावर जमिनीवर विश्रांती घ्यावी लागत आहे. सभोवताली कचर्‍याचे साम्राज्य असतानाही रूग्णांना विश्रांती घ्यावी लागते. प्रतिभा महिला बचत गटांच्यावतीने रुग्णालयासमोर प्रतिक्षालयात दहा रुपये शिवभोजन थाळी मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. रुग्णालय परिसरात चार ते पाच ठिकाणी नामफलक लावले आहेत. मात्र, परिसरामध्ये पाहणी केली असता कुठेही शिवभोजन थाळी दिसून आली नाही. शिवभोजन थाळीचे बस्तान गुंडाळल्याचे दिसून येत आहे.

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी कागदोपत्री लाखो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्ष मात्र रुग्णांच्या सोयी सुविधांसासठी दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होत आहे. प्रशासन रुग्णांच्या नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे.

                                         – बाबासाहेब कांबळे, उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघ

पुणे जिल्हा रुग्णालयात अनेक रूग्ण पुणे जिल्हा परिसरातून येतात. मात्र, या ठिकाणी रुग्णांना व नातेवाईकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

                                                – गणेश ढोरे, सामाजिक कार्यकर्ते, जुनी सांगवी

माझ्याकडे प्रभारी चार्ज आहे. मी आजच कार्यालयाला नातेवाईकांचे प्रतिक्षालय सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. दोन दिवसांत पाठपुरावा करुन नातेवाईकांचे प्रतिक्षालय सुरू करण्यात येईल.

                                     – डॉ. अशोक नांदापूरकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

 

Back to top button