नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ओबीसींना २०.५ टक्के आरक्षण | पुढारी

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ओबीसींना २०.५ टक्के आरक्षण

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.२९) तिस-यांदा वाशीतील विष्णू दास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) 20.5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यामुळे एकूण 41 प्रभागातील 122 उमेदवारांमधून 25 उमेदवार हे आता ओबीसी उमेदवार असणार आहेत.

आजच्या आरक्षण सोडतीनंतर शनिवारी (दि. 30) आरक्षण प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालयात निवडणूक विभाग आणि आठ विभाग कार्यालयात या हरकती, सूचना नागरिक देऊ शकणार आहेत. आज काढलेल्या ओबीसी आरक्षणामुळे संभाव्य उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलणार आहे.

यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखली होती. मात्र, आता ओबीसींना 20.5 टक्के म्हणजे एकूण 122 उमेदवारांपैकी 25 जागा (उमेदवार) हे ओबीसी प्रभागातून आपले भवितव्य आजमावणार आहेत. भाजप, शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे ओबीसीसह इतर उमेदवारांची यादी यापूर्वीच स्थानिक नेत्यांनी तयार करून ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेला या सार्वत्रिक निवडणुकीत तगडे, वजनदार आणि साम, दाम, दंड, भेद अशा यादीत असणारे उमेदवार द्यावे लागतील.

याआधी महाविकास आघाडी असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी नेत्यांच्या मान्यतेने स्थानिक पातळीवर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी केली होती. या पक्षांनी एकत्रित सहा बैठका घेतल्या होत्या. यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या प्रभागात उमेदवार नसेल. अशा प्रभागात शिवसेनेकडून उमेदवार आयात केले जाणार होते. ही खटाटोप केवळ भाजपचे नेते, माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांना शह देण्यासाठी ही खेळी खेळली जाणार होती. मात्र, त्या आधीच शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपशी युती केल्याने स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीवर पाणी फिरले.

नवी मुंबईतील एक गट शिंदे गटात सामील झाला. यामुळे आघाडीत बिघाडी होऊन नवी मुंबईतील आघाडीने तयार केलेल्या संभाव्य उमेदवारांच्या याद्यांचा पालापाचोळाच झाला. ज्यांच्या विरोधात दंड थोपटून आघाडी केली होती. त्याच भाजपच्या गणेश नाईक यांच्याशी आता शिंदे गटाला हात मिळवणी करावी लागणार आहे. यामध्ये अनेकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर आखाड्यात उतरणार आहे. भाजपची जबाबदारी आ. गणेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेस बंटी पाटील तर मनसे गजानन काळे यांच्यावर सोपवली जाईल.

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022

एकूण प्रभाग – 41

एकूण जागा – 122

महिला – 61

अनुसूचित जाती – 11

अनुसूचित जमाती – 02

नागरिकांचा मागास प्रवर्ग – 25

खुला – 84

एकूण मतदार – 8,45,531

महिला – 3,75,949

पुरूष – 4,69,526

इतर – 56

हेही वाचलंत का ? 

Back to top button