

मुंबई : इस्रायल - अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून गुरुवारी संध्याकाळपर्यंत आखाती देशातून 2 हजार 730 प्रवासी मुंबईत परतले आहेत. यामध्ये अबुधाबी आणि दुबईमधील प्रवाशांची संख्या अधिक आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारतातील आतापर्यंत एकुण 1 हजार 609 विमाने रद्द झाली आहेत. 3 मार्च रोजी भारतात 24 भारतीय तर 9 इतर कंपन्याची मिळून एकूण 33 विमाने आली. 4 मार्च रोजी नियोजित विमानांपैकी 30 इंडिगो, 23 एअर इंडिया, 5 इतर अशी एकुण 58 विमाने मुंबईत येणार होती. त्यापैकी केवळ 5 विमाने दाखल झाली आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण व आपत्कालीन केंद्राचे व्यवस्थापक विशेषकार सूर्यवंशी यांनी दिली.
महाराष्ट्रातील इतर देशात 1682 प्रवासी अडकले होते. त्यानुसार 11 विमानांमधून युएई (अबुधाबी) ते मुंबई इथीहाद विमानाद्वारे 200 तर एमीरातेस विमानाद्वारे 450 प्रवासी आले. सौदी अरेबिया ते मुंबई इंडिगोच्या 2 विमानाद्वारे 400 प्रवासी तर स्टार एअर विमानाद्वारे 167 प्रवासी आले. दुबई ते मुंबई 5 मार्च रोजी 1530 असे मिळून आतापर्यंत 2730 प्रवासी आले असल्याचे डॉ. चव्हाण व सूर्यवंशी यांनी सांगितले.