नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र चढवले. बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केलेले कर्तबगार माणसे शिवसेनेत उपजायला लागली, त्यावेळी एक-एकाला कमी करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचा धक्कादायक आरोप राणे (Narayan Rane) यांनी आज (दि. २६) पत्रकार परिषदेत केला.
(Narayan Rane) रमेश मोरेंची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधवची हत्या कुणी केली? ठाण्यातील एका नगरसेवकांची हत्या कुणी केली? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. 'मी शिवसेना सोडली तेव्हा माझी हत्या करण्यासाठी देशाबाहेरील गॅगस्टरला सुपारी दिली होती. परंतु, आई-वडिलांच्या पुण्याईने मी वाचलो. ज्यांना सुपारी दिली त्यांनीच माझ्याशी संपर्क साधून सावध राहण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सुपारी देवून देखील मी शांत राहिलो, असा दावा राणे यांनी केला. एकनाथ शिंदे यांची देखील हत्या करण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी देण्यात आल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
सत्ता गेल्यानंतर जळफळाटातून एक केविलवाणा प्रयत्न म्हणून त्यांनी महाराष्ट्रासमोर ही व्यथा मांडली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्याचा दु:ख नसल्याचे ठाकरे जरी सांगत असले, तरी ते व्याकूळ झाले आहेत. त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दृष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाच्या कुठल्याही हिताचे काम केले नाही, असा दावा त्यांनी केला. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचे काम. ठाकरेंच्या पक्षपाती पणामुळे आमदारांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्या नावावर सत्ता स्थापन केली असल्याचे राणे म्हणाले.
संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याचे पहिले काम राऊत यांनी केले. आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. राऊत मनातून खूश आहेत. त्यांचे गुरू पवारांनी सोपवलेले काम त्यांनी यशस्वी केल्याचा टोला देखील राणे यांनी लगावला. राऊत हे उद्धव ठाकरेंना भडकवण्याचे तसेच आपल्या तालावर नाचवण्याचे काम करतात, असे दावाही राणे यांनी केला. बाळासाहेबानंतर कुठल्या शिवसैनिकांना, नेत्यांना उद्धव ठाकरेंनी विश्वास दिला. मातोश्रीबाहेर कुठल्या शिवसैनिकांच्या मदतीला धावले? त्यांना प्रेम, विश्वास दिला? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचलंत का ?