Jayant Patil : आवडणारे मिळाल्याने उद्धव ठाकरे नावडते झाले: जयंत पाटलांचा शिंदे गटावर निशाणा | पुढारी

Jayant Patil : आवडणारे मिळाल्याने उद्धव ठाकरे नावडते झाले: जयंत पाटलांचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले, म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटावर केली. गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले, तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, असा घणाघाती आरोपही पाटील  (Jayant Patil) यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले की, शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. कुणाला कशाची भीती आहे, याची माहिती लोकांना आहे. तुम्ही जर गावखेड्यात गेलात, तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत, याची कल्पना येईल. शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही. निष्ठा न बदलणारा म्हणजेच शिवसैनिक. आजघडीला सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक फक्त इकडे- तिकडे झाले आहेत, मात्र खरा शिवसैनिक अजून तळ ठोकून आहे, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil : सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन हवा

सध्या ईडी, सीबीआय, आयटी मार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील, मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गळती नाही

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शासन आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे कामे घेऊन जात असतात. त्यात गैर काहीच नाही. आपल्या साखर कारखान्याच्या प्रश्नाविषयी बबन शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांना भेटले तशी त्यांनी पक्षाला कल्पनाही दिली असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button